See also ebooksgratis.com: no banners, no cookies, totally FREE.

CLASSICISTRANIERI HOME PAGE - YOUTUBE CHANNEL
Privacy Policy Cookie Policy Terms and Conditions
चंद्र - विकिपीडिया

चंद्र

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मुखपृष्ठ सदर लेख
हा लेख मार्च १, २००८ रोजी मराठी विकिपीडियावरील मुखपृष्ठ सदर होता.
चंद्र  

पृथ्वीवरून दिसणारा चंद्र

चंद्राच्या कला
कक्षीय गुणधर्म
उपपृथ्वी: ३,६३,१०४ कि.मी.
अपपृथ्वी ४,०५,६९६ कि.मी.
परिभ्रमण काळ: २७.३२१५८२ दिवस
सिनॉडिक परिभ्रमण काळ: २९.५३०५८८ दिवस
सरासरी कक्षीय वेग: १,०२२ मी. प्रति सेकंद
कक्षेचा कल: ५.१४५ °
कोणाचा उपग्रह: पृथ्वी
भौतिक गुणधर्म
सरासरी त्रिज्या: १,७३७.१० कि.मी.
विषुववृत्तीय त्रिज्या: १,७३८.१४ कि.मी.
धृवीय त्रिज्या: १,७३५.९७ कि.मी.
फ्लॅटनिंग: ०.००१२५
परीघ: १०,९२१ कि.मी. (विषुववृत्तावर)
पृष्ठभागाचे क्षेत्रफळ: ३.७९३ x १० वर्ग कि.मी.
( पृथ्वीच्या ०.०७४ पट)
वस्तुमान: २.१९५८ x १०१० घनमीटर
सरासरी घनता: ३,३४६.४ कि.ग्रॅ प्रति घनमीटर
पृष्ठभागावरील गुरुत्वाकर्षण (विषुववृत्ताजवळ): १.६२२ मी. प्रति वर्ग सेकंद
मुक्तिवेग: २.३८ कि.मी./सेकंद
सिडेरियल दिनमान: २७.३२१५८२ दिवस
विषुववृत्तावरील परिवलनवेग: ४.६२७ मी/सेकंद
आसाचा कल: १.५४२४°
पृष्ठभागाचे तापमान:
   विषुववृत्तीय
   ८५° उत्तर
किमान सरासरी कमाल
१०० के २२० के ३९० के
७० के १३० के २३० के
विशेषणे: चांद्र


चंद्र पृथ्वीचा एकमात्र नैसर्गिक उपग्रह आहे. चंद्र आकारमानाप्रमाणे सूर्यमालेतील पाचवा मोठा नैसर्गिक उपग्रह आहे. पृथ्वी व चंद्रामधील अंतर ३,८४,४०३ कि.मी. असून, हे अंतर पृथ्वीच्या व्यासाच्या सुमारे ३० पट आहे. चंद्राचा व्यास हा पृथ्वीच्या व्यासाच्या एक चतुर्थांशाहून थोडासा जास्त म्हणजे ३,४७४ कि.मी. आहे.[१] याचाच अर्थ असा की चंद्राचे वस्तुमान हे पृथ्वीच्या सुमारे २% आहे व चंद्राची गुरुत्वाकर्षण शक्ती ही पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीच्या सुमारे १७% इतकी आहे. चंद्राला पृथ्वीभोवती एक प्रदक्षिणा घालण्याकरीता २७.३ दिवसांचा कालावधी लागतो. तसेच चंद्र, सूर्य व पृथ्वी यांच्यातील भौमितिक स्थानांमुळे दर २९.५ दिवसांनी चंद्राच्या कलांचे एक आवर्तन पूर्ण होते.

चंद्र ही एकच अशी खगोलीय वस्तू आहे ज्यावर मनुष्याने पाउल ठेवलेले आहे. सोव्हियत संघाचे लूना १ हे अंतराळयान पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणातून सुटका करुन घेऊन चंद्राच्या अतिशय जवळून जाणारी पहिली वस्तू आहे. लूना २ हे अंतराळयान सर्वप्रथम चंद्राच्या पृष्ठभागावर धडकले. तसेच लूना ३ या यानाने चंद्राच्या दुसर्‍या बाजूची सर्वप्रथम छायाचित्रे घेतली. ही तिन्ही याने सोव्हियत संघाने १९५९ साली सोडली. १९६६ साली चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणारे पहिले अंतराळयान हे लूना ९ होते; तसेच लूना १० ने चंद्राला सर्वप्रथम प्रदक्षिणा घातल्या. [१] अमेरिकेची अपोलो मोहीम ही आजवरची एकमेव मोहीम आहे ज्यात मनुष्याने चंद्रावर पाऊल ठेवलेले आहे.

अनुक्रमणिका

चंद्राचा पृष्ठभाग

चंद्राच्या दोन बाजू

चंद्राला स्वत:भोवती फिरण्यास लागणारा वेळ हा पृथ्वीच्या भोवती फिरण्यास लागणार्‍या वेळाएवढाच असल्यामुळे चंद्राची कायम एकच बाजू पृथ्वीच्या दिशेला असते. चंद्राच्या दुसर्‍या बाजूची छायाचित्रे ही सर्वप्रथम लूना ३ या अंतराळयानाने १९५९ साली घेतली.

पृथ्वीवरुन पाहण्याच्या विशिष्ट कोनामुळे चंद्राचा एकूण ५९% इतका भाग पृथ्वीवरून दिसतो. पण एकाच ठिकाणाहून जास्तीत जास्त ५०% भागच पाहता येतो.

 
चंद्राची पृथ्वीकडील बाजू   चंद्राची पृथ्वीविरुद्ध बाजू

चंद्राच्या दोन्ही बाजूंमध्ये लक्षात येणारा सर्वात मोठा फरक म्हणजे चंद्राच्या पृथ्वीकडील बाजूवर दिसणारे डाग (मारिया).

मारिया

चंद्राच्या पृथ्वीकडील बाजूवर असलेल्या डागांना ”मारिया” असे नाव आहे. हे नाव ”लॅटिन” भाषेतील ”मेअर” म्हणजे ”समुद्र” या शब्दाचे अनेकवचन आहे. पूर्वीचे खगोलशास्त्रज्ञ या डागांना पाण्याचे समुद्र समजत असत. आता मात्र हे डाग म्हणजे लाव्हा पासून बनलेले बसाल्ट खडक असल्याचा शोध लागलेला आहे. चंद्रावर धडकलेल्या उल्का तसेच धूमकेतू यांच्यामुळे चंद्राच्या पृष्ठभागावर मोठमोठे खड्डे पडले. या खड्ड्यांमध्ये लाव्हा भरला गेल्याने चंद्राच्या पृष्ठभागावर डाग दिसतात.

चंद्राच्या पृथ्वीकडील बाजूपैकी सुमारे ३१% भाग[१] हा मारिया डागांनी व्यापलेला आहे. तर पृथ्वीविरुद्ध बाजूवर फक्त २% एवढाच भाग या डागांनी व्यापलेला आहे.,[२] यामागील शास्त्रीय कारण म्हणजे चंद्राच्या पृथ्वीकडील बाजूवर असणारे उष्णता निर्माण करणार्‍या घटकांचे जास्त प्रमाण होय..[३][४]

चंद्राच्या पृष्ठभागावरील डागांचा भाग सोडला तर इतर भाग हा उंच पर्वतरांगानी व्यापलेला आहे. या पर्वतरांगा उल्का व धूमकेतूंच्या झालेल्या धडकांमुळे तयार झाल्या असाव्यात असे शास्त्रज्ञांना वाटते. पृथ्वीप्रमाणे अंतर्गत हालचालींमुळे तयार झालेल्या पर्वतरांगा चंद्रावर आढळत नाहीत.

१९९४ साली क्लेमेंटाईन अंतराळयानाने घेतलेल्या चंद्राच्या छायाचित्रांमध्ये असे दिसून आले की चंद्राच्या उत्तरधृवावरील ”पियरी विवराच्या” बाजूने असणार्‍या चार मोठ्या पर्वतरांगांवर पूर्णवेळ प्रकाश असतो. चंद्राच्या अक्षातील छोट्याशा कलण्याने (१.५ अंश) या ठिकाणी कायम प्रकाश असतो. चंद्राच्या दक्षिणधृवाजवळ असणार्‍या काही पर्वतरांगांवर दिवसाच्या ८०% वेळ सूर्यप्रकाश असतो.

चंद्रावरील विवरे

पृथ्वीविरुद्ध बाजूवर असणारे डिडॅलस विवर
पृथ्वीविरुद्ध बाजूवर असणारे डिडॅलस विवर

चंद्राच्या पृष्ठभागावर उल्का तसेच धूमकेतूंच्या धडकेने तयार झालेली अनेक विवरे दिसतात. यातील जवळजवळ पाच लाख विवरांचा व्यास हा १ कि.मी. पेक्षा जास्त आहे.[५] चंद्रावरील वातावरणाचा अभाव, तिथले हवामान व इतर खगोलीय घटनांमुळे ही विवरे पृथ्वीवरील विवरांपेक्षा सुस्थितीत आहेत.

चंद्रावरील सर्वात मोठे विवर म्हणजे दक्षिण धृवाजवळ असणारे एटकेन विवर होय. हे विवर संपूर्ण सूर्यमालेतील सर्वात मोठे ज्ञात विवर आहे. हे विवर चंद्राच्या पृथ्वीविरुद्ध बाजूवर असून त्याचा व्यास सुमारे २,२४९ कि.मी. तर खोली सुमारे १३ कि.मी. आहे..[६] पॄथ्वीकडील बाजूवरील मोठी विवरे म्हणजे इंब्रियम, सेरेनिटटिस, क्रिसियम व नेक्टारिस.

रिगॉलिथ

चंद्राच्या पृष्ठभागावर आढळणारी धूळ म्हणजे रिगॉलिथ. चंद्राच्या पृष्ठभागावर झालेल्या विविध आघातांमुळे ही धूळ तयार झालेली आहे. ही धूळ चंद्राचा संपूर्ण पृष्ठभाग एखाद्या चादरीप्रमाणे व्यापते व हिची जाडी मारियामध्ये ३-५ मी. तर इतरत्र १०-२० मी. इतकी आहे.[७]

पाण्याचे अस्तित्व

असे मानले जाते की उल्का व धूमकेतू जेव्हा चंद्रावर आदळतात तेव्हा त्यांच्यातील पाण्याचा अंश हा चंद्रावर सोडतात. असे पाणी नंतर सूर्यप्रकाशात विघटीत होऊन ऑक्सिजनहायड्रोजन हे वायू तयार होतात. चंद्राच्या अतिशय कमी गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे हे वायू कालांतराने अवकाशात विलिन होतात. पण चंद्राचा अक्ष किंचित कललेला असल्याने चंद्राच्या धृवावरील काही विवरे अशी आहेत की ज्यांच्या तळाशी कधीही सूर्यप्रकाश पोचत नाही. या ठिकाणी पाण्याचे रेणू आढळण्याची शक्यता शास्त्रज्ञांना वाटते.

क्लेमेंटाईन यानाने चंद्राच्या दक्षिण धृवावरील विवरांचा नकाशा बनविला असता[८] संगणकाच्या साहाय्याने केलेल्या आकडेवारीनुसार सुमारे १४,००० वर्ग कि.मी. इतक्या प्रदेशात कधीही सूर्यप्रकाश पोचत नाही असे अनुमान काढण्यात आलेले आहे.[९] क्लेमेंटाईन यानावरील रडारच्या साहाय्याने नोंदविण्यात आलेल्या निरीक्षणांनुसार चंद्राच्या पृष्ठभागावर असलेल्या बर्फापासून तयार झालेल्या छोट्या छोट्या भागांचे अनुमान निघते. तसेच स्पेक्ट्रोमीटरने नोंदविलेल्या निरीक्षणांनुसार चंद्राच्या धृवीय भागांमध्ये हायड्रोजन वायूचे जास्त प्रमाण असल्याचे दिसून येते.[१०] चंद्रावरील एकूण बर्फाचे प्रमाण हे सुमारे एक अब्ज घनमीटर (एक घन कि.मी.) असल्याचे अनुमान शास्त्रज्ञांनी काढलेले आहे.

हा पाण्याचा बर्फ खणून काढून अण्विक जनित्रे अथवा सौर उर्जेवर चालणार्‍या विद्युत जनित्रांच्या साहाय्याने ऑक्सीजन व हायड्रोजन मध्ये रुपांतर करणे शक्य झाल्यास भविष्यात चंद्रावर वसाहती स्थापन करणे शक्य होईल. कारण पृथ्वीवरून पाण्याची वाहतूक करणे अतिशय किचकट व महागडे काम आहे. तरीसुद्धा सध्याच्या काही संशोधकांच्या म्हणण्याप्रमाणे क्लेमेंटाईनच्या रडार मध्ये दिसणारे बर्फाचे भाग हे बर्फ नसून नवीन विवरांमधून निघालेले खडक असण्याची शक्यता आहे.[११] त्यामुळेच चंद्रावर नक्की किती प्रमाणात पाणी आहे हा प्रश्न सध्या तरी अनुत्तरीतच आहे.

भौतिक संरचना

अंतर्गत रचना

सुमारे ४५ अब्ज वर्षांपूर्वी चंद्राचे निर्माण होताना लाव्हाच्या वेगवेगळ्या वेळी झालेल्या स्फटीकीकरण क्रियेमुळे चंद्राचा अंतर्भाग तीन भागांमध्ये विभागला गेलेला आहे.

सर्वात बाहेरचा भाग (क्रस्ट) हा मुख्यत्वे ऑक्सिजन, सिलिकॉन, मॅग्नेशियम, लोह, कॅल्शियमऍल्युमिनियम यांच्या विविध संयुगांमुळे तयार झालेला आहे. या भागाची सरासरी जाडी ही ५० कि.मी. आहे.[१२]

त्याखालील दुसरा भाग (मँटल) हा काही प्रमाणात वितळलेल्या लाव्हामुळे तयार झालेला असून यातील काही भाग पृष्ठभागावर आल्यामुळे चंद्रावर मारिया (डाग) तयार झालेले आहेत. या बसाल्ट खडकांचे पृथ:करण केले असता, मँटल हे मुख्यत्वे ऑलिविन, आर्थोपायरोक्सिन व क्लिनोपायरोक्सिन या पासून तयार झालेले असल्याचे आढळते. तसेच पृथ्वीच्या मँटल मध्ये आढळणार्‍या लोहापेक्षा चंद्राच्या मँटल मध्ये आढळणार्‍या लोहाचे प्रमाण हे बरेच जास्त आहे. काही बसाल्ट खडकांमध्ये टिटॅनियमचे सुद्धा जास्त प्रमाण आढळते. चंद्रावर जे भूकंप होतात त्यांचे केंद्रस्थान ह्याच मँटल मध्ये सुमारे १,००० कि.मी. खोलीवर असल्याचे आढळून येते. पृथ्वीभोवती फिरण्याच्या चंद्राच्या लंबवर्तुळाकार कक्षेमुळे दर महिन्याला चंद्रावर भूकंप होतात.[१२]

सगळ्यांत आतला भाग (कोअर) हा सुमारे ३५० कि.मी. त्रिज्या[१२] असलेला व थोड्याप्रमाणात वितळलेला असा लाव्हाचा गोळा आहे. याचा आकार चंद्राच्या एकूण आकाराच्या फक्त २०% आहे. पृथ्वी तसेच इतर अनेक खगोलिय वस्तूंच्या कोअरचा आकार हा सर्वसाधारणपणे एकूण आकाराच्या ५०% असल्याचे निदर्शनास आलेले आहे. कोअर मुख्यत्वे लोहापासून तसेच लोहाची सल्फरनिकेल बरोबर झालेल्या संयुगांपासून बनल्याचे शास्त्रज्ञ मानतात.

भौगोलिक संरचना

चंद्राची भौगोलिक संरचना
चंद्राची भौगोलिक संरचना

चंद्राच्या भौगोलिक रचनेचा अभ्यास हा मुख्यत्वे क्लेमेंटाईन मोहिमेत जमविलेल्या माहितीच्या आधारे करण्यात आलेला आहे. चंद्रावरील सर्वात कमी उंचीची जागा म्हणजे दक्षिण धृवावर असणारे एटकेन विवर होय. चंद्रावरील सर्वात जास्त उंचीची जागा म्हणजे या विवराच्या इशान्येला असणारी पर्वत शिखरे आहेत. यामुळे असे अनुमान निघते की चंद्रावर धडकलेल्या उल्का अथवा धूमकेतूमुळे अवकाशात उत्सर्जित झालेल्या घटक पदार्थांमुळेच या पर्वतरांगा तयार झालेल्या आहेत. इतर मोठी विवरे, उदा. इंब्रियम, सेरेनिटटिस, क्रिसियम, स्मिथी व ओरिएंटेल सुद्धा अशाच प्रकारच्या भौगोलिक रचना दर्शवितात. चंद्राच्या आकारातील अजून एक वैविध्य म्हणजे पृथ्वीविरुद्ध बाजूवरील पर्वतरांगा या पृथ्वीकडील पर्वतरांगांपेक्षा सुमारे १.९ कि.मी. उंच आहेत.[१२]

गुरुत्वाकर्षण क्षेत्र

चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाचे मोजमाप चंद्राच्या भोवती फिरणार्‍या अंतराळयानाने प्रक्षेपित केलेल्या रेडियो तरंगांच्या मोजमापाने करण्यात आलेले आहे. चंद्राच्या गुरुत्वाकर्षणामध्ये एक विशेष बाब म्हणजे विवरांवर असणारे जास्तीचे गुरुत्वाकर्षण.[१३] या जास्तीच्या गुरुत्वाकर्षणामुळे चंद्राभोवती फिरणार्‍या अंतराळयानाच्या कक्षेवर बराच परीणाम झालेला आढळतो. त्यामुळेच यापुढील चांद्रमोहिमांपूर्वी चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाचा अभ्यास हा अत्यंत महत्वाचा ठरणार आहे.[१४]

चंद्राच्या पृष्ठभागावरील गुरुत्वाकर्षण क्षेत्र
चंद्राच्या पृष्ठभागावरील गुरुत्वाकर्षण क्षेत्र

असे मानण्यात आलेले आहे की चंद्रावर असलेल्या विवरांमध्ये गोठलेला लाव्हा या विशिष्ट ठिकाणी जास्तीचे गुरुत्वाकर्षण असण्याला कारणीभूत आहे. पण जास्तीच्या गुरुत्वाकर्षणाचे अस्तित्व हे फक्त लाव्हाच्या प्रवाहाने होत नसून क्रस्टची जाडी कमी होण्याने पण दिसून आलेले आहे. लुनार प्रोस्पेक्टर गुरुत्वाकर्षण अभ्यासामध्ये काही ठिकाणी विवरे नसताना सुद्धा जास्तीचे गुरुत्वाकर्षण आढळून आलेले आहे.[१५]

चुंबकीय क्षेत्र

चंद्राचे चुंबकीय क्षेत्र
चंद्राचे चुंबकीय क्षेत्र

चंद्राचे बाह्य चुंबकीय क्षेत्र हे सुमारे १ ते १०० ननोटेस्ला इतक्या ताकदीचे आहे. जे पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राच्या सुमारे १०० पटीनी कमी आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पृथ्वीप्रमाणे चंद्र हा दोन धृवांचा चुंबक नाही, तर जे काही चुंबकीय क्षेत्र तयार झालेले आहे ते संपूर्णत: क्रस्ट मध्ये असणार्‍या घटकांमुळे तयार झालेले आहे.[१६] शास्त्रज्ञांचे असे अनुमान आहे की चंद्रावर येऊन धडकलेल्या उल्का तसेच धूमकेतूंमुळे हे चुंबकीय क्षेत्र तयार झाले असावे कारण विवरांजवळ हे क्षेत्र जास्त प्रभावी आहे.[१७]

वातावरण

चंद्रावर अतिशय विरळ वातावरण आहे. चंद्रावर असलेल्या वातावरणाचे एकूण घनमान फक्त १० कि.ग्रॅ. आहे.[१८] चंद्रावर असणार्‍या वातावरणाचे प्रमुख स्रोत म्हणजे एक - क्रस्ट आणि मटल मध्ये होणार्‍या प्रक्रियांमुळे रेडॉन सारख्या वायूंचे उत्सर्जन. दुसरे म्हणजे छोट्या उल्का, सौरवात तसेच सूर्यप्रकाशामुळे होणारे विविध पदार्थांचे विघटन. आत्तापर्यंत विविध प्रकारे केल्या गेलेल्या चाचण्यांमधून चंद्राचे वातावरण हे मुख्यत: सोडियम, पोटॅशियम, रेडॉन, पोलोनियम, आर्गॉन, हेलियम, ऑक्सिजन तसेच मिथेन, नायट्रोजन, कार्बन मोनोक्साईडकार्बन डायाक्साईड या वायूंचे बनले असल्याचे सिद्ध झालेले आहे.[१९]

पृष्ठभागावरील तापमान

चंद्रावर दिवसाचे सरासरी तापमान हे १०७ अंश सेल्शियस तर रात्रीचे सरासरी तापमान हे उणे १५३ अंश सेल्शियस असते.[२०]

उत्पत्ती

चंद्राची निर्मिती

चंद्राच्या उत्पत्तीबद्दल खगोलशास्त्रज्ञांमध्ये अनेक मतभेद आहेत. चंद्राची निर्मिती ही सूर्यमालेच्या उत्पत्ती नंतर सुमारे ३-५ कोटी वर्षांनंतर म्हणजेच सुमारे ४५ अब्ज वर्षांपूर्वी झाल्याचे शास्त्रज्ञ मानतात.[२१] चंद्राच्या उत्पत्ती बद्दल जी अनेक मते आहेत त्यातील काही पुढीलप्रमाणे:

  • फिजन थियरी - जुन्या संशोधनानुसार चंद्र हा पृथ्वीपासून तुटून वेगळा झालेला तुकडा असल्याचे मानण्यात आले. या तुकड्यामुळे पृथ्वीच्या पृष्ठभागावर खूप मोठी दरी तयार झाली ती म्हणजेच प्रशांत महासागर असे अनुमान काढण्यात आलेले होते.[२२] पण अशा प्रकारे तुकडे होण्यासाठी पृथ्वीची सुरवातीची फिरण्याची गती ही खूप जास्त असायला हवी होती. तसेच जर असा तुकडा पडलेला असेल तर तो तुकडा पृथ्वीच्या विषुववृत्ताच्या अक्षातच पृथ्वी भोवती फिरत राहीला असता असे शास्त्रज्ञ मानतात.


  • कॅप्चर थियरी - काही शास्त्रज्ञांच्या मते चंद्राची निर्मिती ही इतरत्र कोठेतरी झाली व तो पॄथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या कक्षेत आल्यामुळे कायमचा पृथ्वीभोवती फिरत राहिला.[२३] पण अशा तर्‍हेने एखाद्या वस्तूला पृथ्वी भोवती फिरत ठेवण्यासाठी लागणार्‍या काही गोष्टी (जसे की जास्तीची उर्जा वापरण्यासाठी जास्तीचे वातावरण) अस्तित्वात नाहीत.


  • कोफॉर्मेशन थियरी - या थियरी प्रमाणे शास्त्रज्ञांना असे वाटते की सूर्यमालेच्या निर्मितीच्या वेळी पृथ्वी व चंद्राची एकाच ठिकाणी उत्पत्ती झाल्याचे शास्त्रज्ञ मानतात. चंद्राची निर्मिती ही पृथ्वीच्या भोवती फिरणार्‍या व सूर्यमालेतील उरलेल्या पदार्थांपासून झाली असावी. पण काही शास्त्रज्ञांच्या मते चंद्रावर आढळणार्‍या लोहाचे प्रमाण ही थियरी सिद्ध करू शकत नाही.


ही सर्व अनुमाने चंद्र व पृथ्वी यांच्या फिरण्याने आढळणार्‍या कोनीय बलाचे स्पष्टीकरण देऊ शकत नाहीत.[२४]

  • जायंट इम्पॅक्ट थियरी - ही थियरी आजकालच्या शास्त्रज्ञांमध्ये लोकप्रिय आहे. या थियरी प्रमाणे साधारण मंगळाच्या आकाराची एक वस्तू (थिया) ही पृथ्वीवर धडकल्याने पृथ्वीवरील पुरेसे पदार्थ पृथ्वीच्या भोवती विखुरले गेले.[१] या पदार्थांपासूनच नंतर चंद्राची निर्मिती झाली. संगणकावर बनविलेली ह्या घटनेची संचिका चंद्र व पृथ्वी यांच्यामधील कोनीय बलाचे तसेच चंद्राच्या छोट्या कोअरचे यथोचित स्पष्टीकरण देते.[२५] तरीही या अनुमानात अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत. जसे की पृथ्वीवर धडकणार्‍या वस्तूचा आकार तसेच चंद्राच्या निर्मिती मध्ये पृथ्वीचे घटक कोणते व त्या वस्तूवरील घटक कोणते.

लाव्हाचा समुद्र

चंद्राची अंतर्गत रचना
चंद्राची अंतर्गत रचना

राक्षसी धडकेच्या वेळी तयार झालेल्या अती उष्णतेमुळे असे मानण्यात येते की चंद्राचा बराचसा भाग हा सुरवातीला वितळलेल्या अवस्थेत होता. हा विरघळलेला बाह्य पृष्ठभाग जवळ जवळ ५०० कि.मी. ते चंद्राच्या गाभ्यापर्यंत खोल होता.[३] यालाच लाव्हाचा समुद्र असे म्हणले जाते.

हा समुद्र जेव्हा थंड होऊन गोठू लागला, तेव्हा वेगवेगळ्या प्रकारे झालेल्या स्फटीकीकरणामुळे क्रस्ट व मँटल वेगवेगळे तयार झाले.[३] यातील कमी घनतेचे पदार्थ पृष्ठभागावर जमा झाले तर जास्त घनतेचे पदार्थ चंद्राच्या गाभ्यामध्ये (कोअर) जमा झाले.

चंद्रावरील खडक

चंद्रावर मुख्यत्वे दोन प्रकारचे खडक आढळतात. पर्वतरांगांमध्ये सापडणारे अनॉर्थाईट युक्त खडक व मारिया मध्ये सापडणारे बसाल्ट खडक.[२६][२७] पृथ्वीवरील बसाल्ट खडक व चंद्रावरील बसाल्ट खडक यातील मुख्य फरक म्हणजे चंद्रावरील खडकांमध्ये आढळणारे जास्तीचे लोहाचे प्रमाण.[२८][२९]

चंद्रावर गेलेल्या अंतराळवीरांनी चंद्रावरील धूळीचे वर्णन बर्फासारखी मऊ व बंदूकीच्या दारूसारखा वास असणारी असे केले आहे.[३०] ही धूळ मुख्यत: चंद्रावर धडकलेल्या उल्काधूमकेतूंमुळे तयार झालेली आहे. या धूळीमध्ये मुख्य घटक म्हणजे सिलिकॉन डायॉक्साईड (SiO2). तसेच त्यामध्ये कॅल्शियममॅग्नेशियम सुद्धा आढळते.

फिरण्याची कक्षा व पृथ्वीशी संबंध

अपोलो ८ मोहिमेच्या वेळी चंद्रावरून घेतलेले पृथ्वीचे छायाचित्र
अपोलो ८ मोहिमेच्या वेळी चंद्रावरून घेतलेले पृथ्वीचे छायाचित्र

चंद्र पृथ्वीभोवतीची एक प्रदक्षिणा सुमारे २७.३ दिवसात पूर्ण करतो. पण पृथ्वीसुद्धा सूर्याभोवती फिरत असल्यामुळे पृथ्वीच्या आकाशात त्याच ठिकाणी यायला चंद्राला जवळजवळ २९.५ दिवस लागतात.[१] इतर ग्रहांचे उपग्रह त्या त्या ग्रहांच्या विषुववृत्तावरून फिरतात. पण चंद्र मात्र थोडासा तिरका फिरतो. चंद्र हा ग्रहाच्या प्रमाणात बघितल्यास सूर्यमालेतील सर्वात मोठा नैसर्गिक उपग्रह आहे.

चंद्राच्या गुरुत्वाकर्षणामुळेच पृथ्वीवर भरती - ओहोटीचे चक्र चालू असते. समुद्रांतर्गत होणार्‍या या घडामोडींमुळे चंद्र व पृथ्वी यांच्यातील सरासरी अंतर ३.८ से.मी. प्रति वर्ष या प्रमाणात वाढते आहे.[३१] कोनीय बलामुळे तसेच या वाढणार्‍या अंतरामुळे पृथ्वीची स्वत:भोवती फिरण्याची गती ०.००२ सेकंद प्रति दिवस प्रति शतक या प्रमाणात कमी होत आहे.[३२]

चंद्र व पृथ्वी यांच्या जोडीला बरेच जण जोडग्रह मानतात. या मानण्याला चंद्राचा पृथ्वीच्या प्रमाणात असलेला आकार कारणीभूत आहे. चंद्राचा व्यास पृथ्वीच्या व्यासाच्या एक चतुर्थांश आहे व त्याचे वस्तुमान पृथ्वीच्या १/८१ पट आहे. तरीसुद्धा काहीजण ही बाब मानत नाहीत कारण चंद्राचा पृष्ठभाग हा पृथ्वीच्या एक दशांशापेक्षा कमी आहे.

१९९७ मध्ये ३७५३ क्रुइथ्ने (Cruithne) नावाचा लघुग्रह सापडला. या लघूग्रहाची कक्षा ही पृथ्वीच्या भोवती घोड्याच्या नालाच्या आकारातील होती. तरीसुद्धा खगोलशास्त्रज्ञ या लघुग्रहाला पृथ्वीचा दुसरा चंद्र मानत नाहीत कारण या लघुग्रहाची कक्षा स्थिर नाही.[३३] या लघुग्रहाप्रमाणेच फिरणारे (५४५०९) २००० पीएच ५, (८५७७०) १९९८ यूपी१ व २००२ ए‍ए२९ हे तीन लघुग्रह आजपर्यंत शोधण्यात आलेले आहेत.[३४]

चंद्र व पृथ्वी यांचे आकार व त्यांमधील अंतर हे प्रकाशाच्या वेगाच्या हिशोबात इथे दाखविलेले आहे. पृथ्वी व चंद्र यांच्यातील सरासरी अंतर कापायला प्रकाशाला  १.२५५ सेकंद लागतात तर सूर्य व पृथ्वी यांच्यातील सरासरी अंतर कापण्यास प्रकाशाला ८.२८ मिनीटे लागतात.
चंद्र व पृथ्वी यांचे आकार व त्यांमधील अंतर हे प्रकाशाच्या वेगाच्या हिशोबात इथे दाखविलेले आहे. पृथ्वी व चंद्र यांच्यातील सरासरी अंतर कापायला प्रकाशाला १.२५५ सेकंद लागतात तर सूर्य व पृथ्वी यांच्यातील सरासरी अंतर कापण्यास प्रकाशाला ८.२८ मिनीटे लागतात.

भरती व ओहोटी

पृथ्वीवरील समुद्रांमध्ये होणारे भरती - ओहोटीचे चक्र हे चंद्राच्या गुरुत्वाकर्षणामुळे होते. चंद्राच्या गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वीच्या चंद्राकडील बाजूवरील पाणी हे इतर भागांपेक्षा चंद्राकडे जास्त ओढले जाते. पृथ्वीच्या फिरण्यामुळे हे पाणी किनार्‍यावर येते. एका ठिकाणी भरती आलेली असताना पृथ्वीच्या चंद्राविरुद्ध बाजूवर ओहोटी आलेली असते.

भरती - ओहोटीच्या चक्राचा चंद्राच्या कक्षेवर सूक्ष्मसा परीणाम होतो. या चक्राच्या परीणामाने चंद्र हळूहळू पृथ्वीपासून दूर जात आहे. ही गती वर्षाला ३.८ से.मी. इतकी सूक्ष्म आहे.[३५] जोपर्यंत चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव पृथ्वीवरील समुद्रांवर होत राहील तोपर्यंत चंद्र पृथ्वीपासून दूर जात राहील. त्यानंतर चंद्राची कक्षा स्थिर होईल.

ग्रहणे

३ मार्च २००७ रोजी दिसलेले चंद्रग्रहण
३ मार्च २००७ रोजी दिसलेले चंद्रग्रहण

जेव्हा चंद्र, पृथ्वी व सूर्य एका रेषेत येतात, तेव्हा एकाची छाया दुसर्‍यावर पडते. यालाच ग्रहण असे म्हणतात. सूर्यग्रहण अमावास्येच्या आसपास होते जेव्हा चंद्र, पृथ्वी व सूर्याच्या मध्ये येतो. याउलट चंद्रग्रहण पोर्णिमेच्या आसपास होते जेव्हा पृथ्वी, चंद्र व सूर्य यांच्यामध्ये येते. चंद्राची कक्षा ही पृथ्वीच्या कक्षेशी जवळजवळ ५ अंशाचा कोन करते. त्यामुळेच प्रत्येक पोर्णिमा अथवा अमावास्येला ग्रहण होत नाही. ग्रहण होण्यासाठी चंद्र हा पृथ्वी व चंद्राच्या कक्षा जिथे एकमेकांना छेदतात तिथे असावा लागतो.[३६]

खगोलशास्त्रज्ञांनी वेगवेगळी गणिते करून असा निष्कर्ष काढला आहे की सूर्यग्रहण अथवा चंद्रग्रहण हे दर ६,५८५.३ दिवसांनी (१८ वर्षे, ११ दिवस व ८ तास) होते. या कालावधीला सारोस चक्र असे म्हणतात.[३७]

चंद्र व सूर्याच्या कक्षा (पृथ्वीवरुन पाहताना) बर्‍याच ठिकाणी एकमेकांना छेदतात, त्यामुळेच खग्रास अथवा खंडग्रास सूर्यग्रहणे पहायला मिळतात. खग्रास सूर्यग्रहणात सूर्य पूर्णपणे चंद्राच्या मागे झाकला जातो व सूर्याभोवती असणारे तेजोवलय (Corona) दृष्टीपथास येते. चंद्र व पृथ्वीमधील अंतर हे सूक्ष्म गतीने बदलत असल्यामुळे चंद्राचा कोनीय व्यास कमी होत आहे. याचाच अर्थ असा की काही कोटी वर्षांपूर्वी प्रत्येक ग्रहणात सूर्य पूर्णपणे चंद्रामागे झाकला जात होता. तसेच साधारण ६० कोटी वर्षांनंतर चंद्र कधीही पूर्णपणे सूर्याला झाकू शकणार नाही व फक्त खंडग्रास सूर्यग्रहण पहायला मिळेल.

ग्रहणा संदर्भात घडणारी घटना म्हणजे अधिक्रमण.

हिंदू संस्कृतीतील चंद्र

हिंदू संस्कृतीत चंद्राचे अनन्यसाधारण महत्व आहे. आजही भारतातील बहुतेक सणउत्सव हे चांद्र दिनदर्शिके प्रमाणेच साजरे केले जातात. उदा. गणेशोत्सव, दिवाळी, इ.

असे म्हणतात की रामाने लहानपणी चंद्रासाठी हट्ट केला होता. तेव्हा कौसल्येने पाण्यात चंद्राचे प्रतिबिंब दाखवून रामाला खुश केले होते.

फार पूर्वीपासूनच चंद्र हा कविजनांना खुणावत आलेला आहे. अनेक प्रेमगीतांमधून चंद्राचे उल्लेख आढळतात. कुठे चंद्राला प्रेयसीच्या चेहर्‍याची उपमा दिलेली आढळते तर कुठे चंद्राच्या साक्षीने प्रेमाच्या आणाभाका घेतलेल्या दिसतात. लहान मुलांच्या गाण्यांमध्येही चंद्राला विशेष स्थान आहे.

समुद्र मंथन

असे मानण्यात येते की अमृत प्राप्तीसाठी देव व दानवांनी केलेल्या समुद्र मंथनातून चंद्राची निर्मिती झाली. भगवान शंकराने हलाहल प्यायल्यानंतर त्याच्या घषात निर्माण झालेल्या दाहाला शांत करण्यासाठी चंद्राचा उपयोग करण्यात आला असे पुराणात नमूद केलेले आहे.

संदर्भ

  1. १.० १.१ १.२ १.३ १.४ स्पूडिज, पी.डी. (२००४). चंद्र. वर्ल्ड बुक ऑनलाईन रेफरन्स सेंटर, नासा.
  2. गिलिज, जे.जे.; स्पूडिज, पी.डी. (१९९६). "चंद्राच्या पृथ्वीविरुद्ध बाजूवरील मारियाची भौगोलिक संरचना". लुनार व प्लॅनेटरी सायन्स २७: ४१३–४०४. 
  3. ३.० ३.१ ३.२ शियरर, सी. (२००६). "थर्मल व मॅग्मॅटिक इव्हॉल्यूशन ऑफ द मून". रिव्ह्यूज इन मिनरॉलॉजी व जियोकेमिस्ट्री ६०: ३६५–५१८. 
  4. टेलर, जी.जे. (२०००-०८-३१). अ न्यू मून फॉर द ट्वेंटीफर्स्ट सेंच्युरी. हवाई इन्स्टिट्यूट ऑफ जियोफिजिक्स अँण्ड प्लॅनेटॉलॉजी.
  5. मेलोश, एच.जे. (१९८९). इम्पॅक्ट क्रेटरींग: अ जियोलॉजीक प्रोसेस. ऑक्सफर्ड युनि. प्रेस. 
  6. टेलर, जी.जे. (१९९८-०७-१७). द बिगेस्ट होल इन सोलर सिस्टीम. हवाई इन्स्टिट्यूट ऑफ जियोफिजिक्स अँण्ड प्लॅनेटॉलॉजी.
  7. हेकेन, जी.; वनिमन, डी.; फ्रेंच, बी. (सं.) (१९९१). लुनार सोर्सबुक, अ यूजर्स गाईड टू द मून. न्यू यॉर्क: केंब्रिज युनि. प्रेस, ७३६. 
  8. लुनार पोलर कॉम्पोसाईट्स. लुनार अँण्ड प्लॅनेटरी इन्स्टिट्यूट.
  9. मार्टल, एल. (२००३-०६-०४). द मून्स डार्क, आईसी पोल्स. हवाई इन्स्टिट्यूट ऑफ जियोफिजिक्स अँण्ड प्लॅनेटॉलॉजी.
  10. युरेका! आईस फाऊंड ऑन लुनार पोल्स. लुनार प्रॉस्पेक्टर (नासा) (२००१-०८-३१).
  11. स्पूडिज, पी. (२००६-११-०६). आईस ऑन द मून. द स्पेस रिव्ह्यू.
  12. १२.० १२.१ १२.२ १२.३ विक्झोरेक, एम. (२००६). "द कॉन्स्टिट्यूशन अँण्ड स्ट्रक्चर ऑफ लुनार इंटेरियर". रिव्ह्यूज इन मिनरॉलॉजी अँण्ड जियोकेमिस्ट्री ६०: २२१–३६४. 
  13. म्यूलर, पी.; जोग्रेन, डब्ल्यू. (१९६८). "मॅसन्स: लुनार मास कॉन्संट्रेशन्स". सायन्स १६१: ६८०–६८४. 
  14. डॉपलर ग्रॅव्हिटी एक्सपरीमेंट रिझल्ट्स. लुनार प्रॉस्पेक्टर (नासा) (२००१-०८-३१).
  15. कोनोप्लीव, ए.; अस्मार, एस.; करांझा, ई.; जोग्रेन, डब्ल्यू.; युवान, डी. (२००१). "रिसेंट ग्रॅव्हिटी मॉडेल्स ऍज अ रिझल्ट ऑफ द लुनार प्रॉस्पेक्टस मिशन". इकारस ५०: १–१८. 
  16. मॅग्नेटोमीटर / इलेक्ट्रॉन रिफ्लेक्टोमीटर रिझल्ट्स. लुनार प्रॉस्पेक्टर (नासा) (२००१). बघितले एप्रिल १२, २००७ ला.
  17. हूड, एल.एल.; हुआंग, झेड. (१९९१). "फॉर्मेशन ऑफ मॅग्नेटीक अनोमालिज ऍण्टिपोडल टू लुनार ईम्पॅक्ट बेसिन्स: टू-डायमेन्शनल मॉडेल कॅल्क्युलेशन्स". जे. जियोफिजिक्स रिसर्च ९६: ९८३७–९८४६. 
  18. ग्लोबस, रूथ (२००२). ईम्पॅक्ट अपॉन लुनार ऍटमॉस्फियर. बघितले ऑगस्ट २९, २००७ ला.
  19. स्टर्न, एस.ए. (१९९९). "द लुनार ऍटमॉस्फियर: हिस्टरी, स्टेटस, करंट प्रॉब्लेम्स, अँड कॉन्टेक्स्ट". रिव्ह. जियोफिज. ३७: ४५३–४९१. 
  20. सरासरी तापमान
  21. क्लीन, टी.; पाम, एच.; मेझ्गर, के.; हॅलिडे, ए.एन. (२००५). "एचएफ–डब्ल्यू क्रोनोमेट्री ऑफ लुनार मेटल्स अँण्ड द एज अँण्ड अर्ली डिफरन्शियेशन ऑफ द मून". सायन्स ३१० (५७५४): १६७१–१६७४. Retrieved on १२/०४/२००७. 
  22. बिंदर, ए.बी. (१९७४). "ऑन द ओरिजिन ऑफ द मून बाय रोटेशनल फिजन". द मून ११ (२): ५३–७६. Retrieved on १२/०४/२००७. 
  23. मिट्लर, एच.ई. (१९७५). "फॉर्मेशन ऑफ ऍन आयर्न-पूअर मून बाय पार्शल कॅप्चर, किंवा: येट अनादर एक्झॉटिक थियरी ऑफ लुनार ओरिजिन". इकारस २४: २५६–२६८. Retrieved on १२/०४/२००७. 
  24. स्टिवन्सन, डी.जे. (१९८७). "ओरिजिन ऑफ द मून – द कोलाईजन हायपोथेसिस". ऍन्युअल रिव्ह्यू ऑफ अर्थ अँण्ड प्लॅनेटरी सायन्सेस १५: २७१–३१५. Retrieved on १२/०४/२००७. 
  25. कॅनप, आर.; अस्फाग, ई. (२००१). "ओरिजिन ऑफ द मून इन अ जायंट ईम्पॅक्ट नियर द एन्ड ऑफ द अर्थ्‌स फॉर्मेशन". नेचर ४१२: ७०८–७१२. 
  26. पॅपिके, जे.; रायडर, जी.; शियरर, सी. (१९९८). "लुनार सॅम्पल्स". रिव्ह्यूज इन मिनरॉलॉजी अँण्ड जियोकेमिस्ट्री ३६: ५.१–५.२३४. 
  27. हायसिंगर, एच.; हेड, जे.डब्ल्यू; वुल्फ, यू.; जौमान्म, आर.; न्यूकम, जी. (२००३). "एजेस अँण्ड स्ट्रॅटिग्राफी ऑफ मेअर बसाल्ट्स इन ओशनस प्रोसेलॅरम, मेअर नंबियम, मेअर कॉग्निटम, अँण्ड मेअर इन्सुलॅरम". जे. जियोफिज. रिस. १०८: १०२९. 
  28. नॉर्मन, एम. (२१/०४/२००१). द ओल्डेस्ट मून रॉक्स. हवाई इन्स्टिट्यूट ऑफ जियोफिजिक्स अँण्ड प्लॅनेटॉलॉजी. बघितले १२/०४/२००७ ला.
  29. वारिचियो, एल. (२००६). इनकॉन्स्टंट मून. लिब्रिस बुक्स. ISBN १-५९९२६-३९३-९. 
  30. द स्मेल ऑफ मूनडस्ट फ्रॉम नासा
  31. अपोलो लेझर रेंजिंग एक्सपरीमेंट्स यिल्ड रिझल्ट्स. नासा (११/०७/२००५). बघितले ३०/०५/२००७ ला.
  32. रे, आर. (१५/०५/२००१). ओशन टाईड्स अँण्ड द अर्थ्‌स रोटेशन. आय्‌ईआरएस स्पेशल ब्युरो फॉर टाईड्स. बघितले १२/०४/२००७ ला.
  33. व्हॅम्प्यू, ए. नो, इट्स नॉट अवर "सेकंड" मून!!!. बघितले १२/०४/२००७ ला.
  34. मोरेस, एम.एच.एम.; मॉर्बिडेली, ए. (२००२). "द पॉप्युलेशन ऑफ नियर-अर्थ ऍस्टेरॉईड्स इन कोऑर्बायटल मोशन विथ द अर्थ". इकारस १६०: १–९. Retrieved on १२/०४/२००७. 
  35. अपोलो लेझर रेंजिंग एक्सपरीमेंट्स यिल्ड रिझल्ट्स. नासा (११/०७/२००५). बघितले ३०/०५/२००७ ला.
  36. थिमन, जे.; कीटिंग, एस. (०२/०५/२००६). एक्लिप्स ९९, फ्रिक्वेंटली आस्कड क्वेश्चन्स. नासा. बघितले १२/०४/२००७ ला.
  37. एस्पेनाक, एफ. सारोस सायकल. नासा. बघितले १२/०४/२००७ ला.



बाह्यदुवे

चित्र व नकाशे
चांद्र मोहिमा
चंद्राच्या कला
इतर

इतर भाषांमध्ये


aa - ab - af - ak - als - am - an - ang - ar - arc - as - ast - av - ay - az - ba - bar - bat_smg - bcl - be - be_x_old - bg - bh - bi - bm - bn - bo - bpy - br - bs - bug - bxr - ca - cbk_zam - cdo - ce - ceb - ch - cho - chr - chy - co - cr - crh - cs - csb - cu - cv - cy - da - de - diq - dsb - dv - dz - ee - el - eml - en - eo - es - et - eu - ext - fa - ff - fi - fiu_vro - fj - fo - fr - frp - fur - fy - ga - gan - gd - gl - glk - gn - got - gu - gv - ha - hak - haw - he - hi - hif - ho - hr - hsb - ht - hu - hy - hz - ia - id - ie - ig - ii - ik - ilo - io - is - it - iu - ja - jbo - jv - ka - kaa - kab - kg - ki - kj - kk - kl - km - kn - ko - kr - ks - ksh - ku - kv - kw - ky - la - lad - lb - lbe - lg - li - lij - lmo - ln - lo - lt - lv - map_bms - mdf - mg - mh - mi - mk - ml - mn - mo - mr - mt - mus - my - myv - mzn - na - nah - nap - nds - nds_nl - ne - new - ng - nl - nn - no - nov - nrm - nv - ny - oc - om - or - os - pa - pag - pam - pap - pdc - pi - pih - pl - pms - ps - pt - qu - quality - rm - rmy - rn - ro - roa_rup - roa_tara - ru - rw - sa - sah - sc - scn - sco - sd - se - sg - sh - si - simple - sk - sl - sm - sn - so - sr - srn - ss - st - stq - su - sv - sw - szl - ta - te - tet - tg - th - ti - tk - tl - tlh - tn - to - tpi - tr - ts - tt - tum - tw - ty - udm - ug - uk - ur - uz - ve - vec - vi - vls - vo - wa - war - wo - wuu - xal - xh - yi - yo - za - zea - zh - zh_classical - zh_min_nan - zh_yue - zu -