See also ebooksgratis.com: no banners, no cookies, totally FREE.

CLASSICISTRANIERI HOME PAGE - YOUTUBE CHANNEL
Privacy Policy Cookie Policy Terms and Conditions
वाघ - विकिपीडिया

वाघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

वाघ
बांधवगड राष्ट्रीय उद्यानातील वाघ
बांधवगड राष्ट्रीय उद्यानातील वाघ
प्रजातींची उपलब्धता
शास्त्रीय वर्गीकरण
वंश: कणाधारी
जात: सस्तन
वर्ग: मांसभक्षक
कुळ: मार्जार कुळ (फेलिडे)
जातकुळी: पँथेरा
जीव: P. tigris
शास्त्रीय नाव
पँथेरा टायग्रीस
(Linnaeus, 1758)
वाघाचा भूतपुर्व आढळप्रदेश(हलक्या पिवळ्या रंगात) २००६ मधील (हिरव्या रंगात).
वाघाचा भूतपुर्व आढळप्रदेश(हलक्या पिवळ्या रंगात) २००६ मधील (हिरव्या रंगात).[१]
इतर नावे
Felis tigris Linnaeus, 1758

वाघ striatus Severtzov, 1858

वाघ regalis Gray, 1867

वाघ ज्याच्या नावातच दरारा, ताकद, शौर्य, राजबिंडेपणा, सौंदर्य दडले आहे असा हा प्राणी मार्जार कुळातील असून भारताचे राष्ट्रीय चिन्ह आहे[२]. मार्जार कुळातील सर्वात मोठा प्राणी म्हणून याची गणना होते व अन्न साखळीतील सर्वात टोकाचे स्थान वाघ भूषवतो. वाघ या नावाची व्युप्ती संस्कृत मधील व्याघ्र या शब्दावरुन आली आहे. इंग्रजीत वाघाला टायगर असे म्हणतात.


अनुक्रमणिका

[संपादन] आढळ व वसतीस्थान

वाघाचे खरे माहेरघर हे पुर्व सायबेरियातील जंगलात मानले जाते आजही तेथे काही शेकड्यांनी वाघ शिल्लक आहेत. व तिथून वाघ मंचुरिया चीन, अग्नेय अशियातून भारतात आला असे मानले जाते[ संदर्भ हवा ]. यातील ब-यात भागात पुर्वी वाघ मुबलक प्रमाणात आढळत होता परंतु शिकार व वसतीस्थानाचा नाश यांमुळे तेथुन वाघ नामशेष ज़ाला. आज प्रामुख्याने जंगली वाघ हा भारत, ब्रम्हदेश थायलंड, चीनरशिया या देशात आढळतो तसेच प्राणिसंग्रहालयातील वाघ आज जगभर सर्वत्र पोहोचले आहेत व वाघांच्या एकूण संख्येचा मोठा भाग आहे. जंगली वाघातील ५० ट्क्यांपेxaही अधिक वाघ आज् फ़क्त् भारतात उरले आहेत्.

वाघांची संख्या भारतात सर्वाधिक असली तरी भारतात देखील वाघ आज दुर्मिळ ज़ाला असून त्यांची संख्या चिंताजनक आहे. भारतातील पंजाब हरियाणा ही राज्ये सोडल्यास सर्व राज्यात् वाघाचे थोडे थोडे अस्तित्व आहे. भारतातील वाघांच्या आढळाचे ५ उपविभाग आहेत खालील प्रमाणे

  1. हिमालय व तराई विभाग यात जम्मु आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तरांचल, उत्तरप्रदेश, बिहार, सिक्कीम, आसाम अरुणाचल प्रदेश व ईशान्य भारतातील राज्ये येतात. यातील हिमालयाच्या तराई जंगलांमध्ये वाघांचे वसतीस्थान आहे.
  2. अरावली पर्वताच्या पुर्व भागातील शुष्क जंगलांमध्ये वाघांचे अस्तित्व आहे यात रणथंभोर सरिस्का सारखे राष्ट्रीय उद्याने येतात
  3. सुंदरबनओरिसा
  4. मध्य भारतातील पानगळी जंगलांमध्ये वाघांचे सर्वाधिक अस्तित्व येथे आढळते. यात कान्हा, बांधवगड, मेळघाट(गुगमाळ्), ताडोबा यासारखी राष्ट्रीय उद्याने व अभयारण्ये येतात
  5. सह्याद्री व मलबार किनारा यात प्रामुख्याने सह्याद्रीचा दxiण भाग येतो. बंदीपूर, मदुमलाई पेरियार इत्यादी. महाराष्ट्रातील सह्याद्रीत केवळ कोयना व चांदोली अभयारण्यात वाघांचे अस्तित्व आहे.

वाघाचे वसती स्थान हे मुख्यत्वे दाट ते अतिशय घनदाट जंगलात आहे. वाघांची शिकार पद्धतीमुळे त्याने त्याचे वसतीस्थान निवडले असावे. राजस्थानातील शुष्क जंगले , तसेच सुंदरबन मधील खारफ़ुटीची जंगले, काज़ीरंगातील गवताळ जंगल असे विविध प्रकारच्या जंगलात वाघाचे वास्तव्य आहे. तरीदेखील वाघ हा बिबट्यासारखा कोणत्याही प्रकारच्या जंगलात रहाण्यास सरावला नाही. तसेच प्रत्येक वाघांचे शिकारीचे xeत्र हे बरेच मोठे असते (साधारणपणे १०० चौ.किमी). त्यामुळे वाघ साधारणपणे मोठी जंगले पसंत करतात. म्हणूनच पुर्वीच्या मध्यम आकाराच्या जंगलात वाघ दिसत व आज ती जंगले हे लहान ज़ाल्यामुळे वाघांचे अस्तित्व संपृष्टात आले[ संदर्भ हवा ]. (उदा: महाराष्ट्रातील सह्याद्री व कोकणातील जंगले)

[संपादन] वर्णन

वाघ हा वर नमूद केल्याप्रमाणे मार्जार कुळातील सर्वात मोठा प्राणी आहे. वाघाचा आकार हा स्थानिक परिस्थितीप्रमाणे कमी जास्त असतो. सायबेरीयन वाघ हा आकाराने मोठा असतो तर भारतीय वाघ त्या मानाने कमी भरतो. सायबेरीयन वाघ हा लांबीला ३.५ मीटर पर्यंत भरतो तर त्याचे वजन ३०० किलोपर्यंत असते. हा अपवाद झाला परंतु १९० -२०० सेमी पर्यंत लांब असतात व त्यांचे सरासरी वजन २२७ किलो पर्यंत असते. भारतीय वाघ साधारणपणे वजनात १०० ते १८० किलोपर्यंत भरतो. मादी ही नरापेक्षा लहान असते. सुमात्रा मधील वाघ हा अजूनच लहान असतो. वाघांची ओळखण्याची सर्वात मोठी खूण् त्यांचे अंगावरचे पट्टे व तांबूस रंगाची फ़र. प्रत्येक वाघाचे अंगावरील पट्टे हे वेगळे असतात. जसे प्रत्येक माणासाचे ठसे वेगळे असतात त्याच प्रमाणे. यावरून वाघांना ओळखता येते. परंतु जंगली वाघ दिसायला मिळणे ही दुर्मिळ घटना असते त्यामुळे ही पद्धत अजूनही ग्राह्य ज़लेली नाही. वाघाच्या अंगावर साधारणपणे १०० पर्यंत पट्टे असतात. पट्ट्यांचा मुख्य उपयोग वाघांना दाट झाडींमध्ये सद्रुश होण्यासाठी होतो. पट्ट्यांबरोबरच प्रत्येक वाघाचे पंज्याची ठेवणही वेगळी असते. वाघांची पारंपारिक गणना पंजाच्या ठश्यांवरूनच होते. वाघाचा पंजा हा वाघाच्या आकारमानाने खूप मोठा व अतिशय ताकदवान असतो. त्याचा व्यास साधारणपणे ६ ते ८ इंच इतका भरतो. जंगलातून फ़िरताना वाघ जरी दिसला नाही तरी वाघाचे ठसे दिसू शकतात.शिकार साधण्यासाठी वाघांचा जबडा जबरदस्त ताकदवान असतो व तो वर-खाली या दिशेत फिरतो. जबड्याची ताकद ते भक्ष्यामध्ये सुळे रुतवण्यासाठी तसेच भक्ष्याला पकडून ठेवणे, ओढून नेणे या कामासाठी वापरतात. वाघाची सर्वात जास्त ताकद त्याच्या जबड्यात असते असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. वाघ हे पट्टीचे पोहोणारे आहेत, म्हणजे त्यांची पोहोण्याची क्षमता चांगलीच असते व या बाबतीत इतर मांजरांपेक्षा वेगळी सवय आहे. वाघांना पाणी आवडते. उन्हाळ्याच्या दिवसात वाघ पाण्यात तासन तास डुबुंन स्वता:ला थंड ठेवतात.


[संपादन] प्रजोत्पादन

वाघाची मादी वर्षातून फारच थोडे दिवस माजावर असते व त्याकाळात नर वाघाशी सलगी करून प्रणयराधना करते. वाघांची प्रणयक्रिडा ही पहाणार्‍याला अतिशय हिंसक वाटू शकते. मोठमोठ्याने डरकाळ्या फोडत वाघांचा समागम चालतो. नर वाघ समागम करताना मादीची मान आपल्या जबड्यात पकडतो. असे का? याचे उत्तर अजून सापडलेले नाही. समागमानंतर काही काळातच नर व मादी विभक्त होतात. मादीला गर्भ धारणा झाल्यावर १६ आठवड्याच्या कालावधीनंतर ३-४ बछड्यांना जन्म देते. पिल्ले ही जन्मतः अतिशय नाजूक व अंध असतात. नर वाघाच्या तडाख्यात पिल्ले सापडल्यावर त्यांना ठार मारतो. म्हणून या काळात मादी अतिशय आक्रमक असते. पिल्ले अतिशय भराभर वाढतात. परंतु पिल्लांचा पूर्ण वाढण्याचा कालावधी १८ महिन्यांचा असतो. पिल्ले आई व भावंडांसोबत दोन ते अडिच वर्षे व्यतीत करतात. वाघाची पिल्ले लहानपणी अतिशय खेळकर असतात. पिल्ले जसजशी मोठी होतात तशी त्यांची आई त्यांना शिकार साधण्यात पारंगत करते. सुरुवातीस अर्धमेली शिकारीशी खेळण्यास शिकवते व नंतर जिवंत सावजांवर हल्ले करण्यास शिकवते. पुर्ण वाढीनंतर पिल्ले स्वतःहून नवीन क्षेत्र शोधण्यास जातात किंवा आई पिल्लांना सोडून निघून जाते. नर पिल्लांना इतर नरांशी क्षेत्र मिळवण्यास स्पर्धा करावी लागते. माद्यांना नवीन क्षेत्र मिळवण्यात फारसे श्रम पडत नाहीत. बहुतेक करून माद्यांना एखाद्या नराच्या मोठ्या क्षेत्रांमध्ये जागा मिळून जाते. वाघांचे बंदीवासातही वीण चांगली होते.


[संपादन] क्षेत्रफळ स्वामित्व

वाघ हा एकटा रहाणारा प्राणी असून तो आपले क्षेत्रफळ राखून ठेवतो. नर वाघाचे क्षेत्रफळ ६० ते १०० चौ.किमी असते. नर वाघ आपल्या क्षेत्रफळात अनेक वाघिणींना आपल्या क्षेत्रफळात सामावून घेतो. वाघिणीचे क्षेत्रफळ १५ ते २० चौ.किमी असते. वाघ बहुतांशी आपल्या क्षेत्रात दुसर्‍या वाघांना येण्यास मज्जाव करतात. तसे केल्यास होणारे भांडण हे जीवघेणे असू शकते. वाघ आपले क्षेत्र झाडांवर मुत्राचे फवारे मारून आखून घेतात. नर वाघ आपल्या पिल्लांचे देखील अतिक्रमण सहन करत नाही. परंतु काही वेळा नर वाघ पित्याची भूमिका देखील बजावल्याचे आढळले आहे. जॉर्ज शेल्लरने तसेच वाल्मिक थापर <[३]. यांनी अश्या नोंदी नोंदवल्या आहेत.

[संपादन] आहार व शिकारपद्धत

वाघाची सर्वात जास्त ताकद जबड्यात असते. जबड्याचा उपयोग शिकार करणे, ओढून नेणे इत्यादी साठी होतो.
वाघाची सर्वात जास्त ताकद जबड्यात असते. जबड्याचा उपयोग शिकार करणे, ओढून नेणे इत्यादी साठी होतो.

वाघ हा पुर्णत: मासांहारी प्राणी आहे तसेच वाघाचे शिकारी कौशल्य वादातीत आहे. पुर्ण वाढ झालेला हत्ती सोडला तर वाघ कोणत्याही जमीनीवरील प्राण्याची शिकार करण्यास समर्थ आहे. वाघाची मुख्य शिकार मध्यम ते मोठ्या आकाराचे प्राणी आहेत. सांबर हे वाघाचे सर्वात आवडते खाद्य आहे. तसेच इतर प्राणी उदा: रानगवा, चितळ, भेकर व इतर हरणे, रानडुक्कर, नीलगाय, रानम्हैस इत्यादी आहेत. वाघाचे खाद्य प्रांतानुसार, उपलब्धतेनुसार तसेच वयानुसार बदलते. पुर्ण वाढलेल्या हत्तीची तसेच गेंड्याची वाघांशी सामना झाल्याची उदाहरणे आहेत. परंतु साधारणपणे सामना टाळण्याचा कल असतो. वाघ बहुतांशी एकटे शिकार करतात. प्रजनन काळात जोडीने शिकार केल्याची उदाहरणे आहेत तसेच पिल्ले आपल्या वाढत्या काळात आईच्या मार्गदर्शनाखाली एकत्रित पण शिकार करतात.

वाघांची शिकारीचे तंत्र हे बहुतांशी एकच असते. वाघ आपले सावज हेरतात व दबा धरून सावजाला न कळता जास्ती जास्त जवळ जाण्याचा प्रयत्न करतात. जेव्हा सावज एक दोन ढांगेच्या अंतरावर येते तेव्हा चपळाईने सावजावर वाघ चाल करून जातो. पुर्ण वाढलेला वाघही साधारणपणे ६५ किमी/तास इतक्या वेगाने चाल करुन जाऊ शकतो. तसेच वाघाची एक ढांग ५ते ६ मीटर पर्यंत जाऊ शकते. या वेगाने व आपल्या वजनाच्या संवेगाने वाघ सावजाला खाली पाडू शकतो. वाघ मोठ्या सावजांसाठी गळ्याचा चावा घेण्याचा प्रयत्न करतो व श्वसननलिका फ़ोडतो. सावज हलू नये यासाठी आपल्या नख्यांनी व ताकदवान पंज्यानी सावजाचा जीव जाई पर्यंत धरून ठेवतो. छोट्या प्राण्यांसाठी वाघ सरळ मानेचा लचका तोडतो यात सावज लगेचच मरुन जाते. एकदम छोट्या सावजांसाठी वाघाचा पंजाचा एक दणका सावजाची कवटी फ़ुटायला पुरेसा असतो.

भारतीय वाघ वानरांची शिकार करण्यासाठी अनोख्या युक्तीचा उपयोग करतात. ज्या झाडावर वानरे असतील तर त्या ठिकाणी जाऊन मोठ्याने डरकाळी फ़ोडतात. वानरांच्या कळपातील काही वानरे घाबरून अथवा ह्रुदय बंद पडून झाडाखाली पडतात[४]. वाघ पाण्यात पोहूनही आपले भक्ष्य मिळवू शकतात तसेच पाण्यातून आपले भक्ष्य ओढूनही घेउन जातात. रणथंभोरचा आजवरचा सर्वाधिक प्रसिद्ध` चंगीज´ नावाचा वाघ पाण्यातील सांबरांवर आक्रमण करण्यात पटाईत होता. याच्या शिकारीची क्षणचित्रे अनेक वाघांवरच्या चित्रपटात आहेत.वाघ शिकार साधल्यावर शिकार ही मुख्यत्वे लपवून ठेवतो. लपवून ठेवण्याचे मुख्य कारण म्हणजे शिकारीला अस्वले, तरस खासकरून गिधाडे इत्यादी प्राण्यांपासून दूर ठेवणे. लपवून ठेवण्यासाठी गुहा अथवा झाडांची दाट जाळी निवडतो. वाघ हा अतिउच्च दर्जाचा शिकारी असला तरी वाघाला एक शिकार मिळवायला सरासरी २० प्रयत्न करावे लागतात[५]. वाघाला एकदा शिकार केल्यावर भक्ष्याच्या आकारानुसार ती शिकार तीन ते सात दिवसापर्यंत पुरते. वाघ महिन्यातून सरासरी तीन ते चार वेळा शिकार साधतात. शिकार्‍यांनी केलेल्या नोंदीप्रमाणे वाघ शिकार खाण्याच्या बाबतीत अतिशय स्वच्छ प्राणी आहे. शिकार खाण्याच्या आगोदर वाघ पोट चिरून आतडी पुर्णपणे बाहेर काढतो व लांबवर फेकतो त्यानंतरच शिकार खाण्यास सुरु करतो. भक्ष्यातील मांसल भाग खाण्यास वाघाची जास्त पसंती असते.

[संपादन] उपप्रजाती

वाघाच्या अनेक उपप्रजाती आहेत. या सर्वात स्थानिक परिस्थितीनुसार सर्वांच्यात बदल घडले आहेत. मुख्य फ़रक हा आकारमानात व थोड्याफ़ार सवयी व शिकारीची पद्धत इत्यादी आहे.

  • बेंगाल टायगर अथवा भारतीय वाघ-(Panthera tigris tigris) ब्रिटीश सर्वात प्रथम भारतात बंगालमध्येच स्थायिक झाल्याने त्यांनी भारतीय वाघाचे बंगाली वाघ असेच नामकरण केले. भारतीय उपजात ही भारत, नेपाळ, भूतान, बांग्लादेश व ब्रम्हदेशात आढळते. भारतातील विविध प्रकारच्या जंगलात त्याचे अस्तित्व आहे. हा आकाराने मध्यम वाघ असून त्याचे २०५ ते २२७ किलो पर्यंत वजन भरते. मादीचे साधारणपणे १४० किलोपर्यंत वजन असते. उत्तर भारतातील वाघांचे वजन दक्षिणेतील वाघांच्या तुलनेत जास्त असते. सध्यस्थितीत भारतात २००० पे़क्षाही कमी वाघ आहेत.सध्याच्या गणनेनुसार भारतात १,४११ वाघ आहेत जे २००२ मधील गणनेपेक्षा ७० टक्यांपेक्षाही कमी आहेत. २००२ मध्ये भारतात ३,६४२ वाघ होते [६]व ही अतिशय चिंताजनक गोष्ट आहे. १९७२ मध्ये वाघांना कायद्यानुसार सरक्षंण मिळाले व अनेक व्याघ्रप्रकल्पांची स्थापना करण्यात आली. त्यानुसार साधारणपणे १९९० पर्यंत चांगले यश मिळाले ४५०० पर्यंत वाघांची संख्या पोहोचण्यास मदत झाली.[७] परंतु आंतराष्ट्रीय माफ़ियांनी भारतीय वाघांना लक्ष्य केले व चोरट्या शिकारीत वाढ ज़ाली. चोरट्या शिकारीमुळे सरिस्का सारख्या एकेकाळी बरेच वाघ असणाऱ्य व्याघ्रप्रकल्पातून आज वाघ नाहिसे झाले आहेत.[८]
  • इंडोचायनीज अथवा कोर्बेट्टी वाघ-(Panthera tigris corbetti)
    इंडोचायनीज अथवा कोर्बेट्टी वाघ
    इंडोचायनीज अथवा कोर्बेट्टी वाघ
    ही वाघाची उपप्रजाती ईशान्य अशिया मध्ये दिसून येते. यात कंबोडिया, मलेशिया, ब्रम्हदेश, थायलंड, व्हिएतनाम, इत्यादी देशात आढळते. ही जात भारतीय वाघापेक्षा गडद रंगाची असून आकार लहान असतो व नराचे वजन १५० ते १९० किलो पर्यंत भरते. माद्यांचे वजन ११० ते १४० किलोपर्यंत असते. साधारणपणे एकून १००० ते १८०० वाघ वन्य अवस्थेत असल्याचा अंदाज आहे. यांचे सर्वात जास्त आढ्ळ मलेशिया मध्ये असून ते चोरट्या शिकारीवरील कडक नियंत्रणामुळेच शक्य झाले आहे. व्हिएतनाममध्ये या प्रजातीची मोठ्या प्रमाणावर चीनी औषधांसाठी शिकार झाल्याचे कळते.
  • मलेशियन वाघ-(Panthera tigris malayensis)[[ हे फ़क्त मलेशियातील द्विपकल्पात दक्षिण भागात आढळून येतात. नुकत्याच झालेल्या संशोधनानुसार ही प्रजाती कोर्बेटी पेक्षा वेगळी असल्याचे सिद्ध झाले आहे. आजमितीला साधारणपणे ६०० ते ८०० वाघ असण्याची शक्यता आहे. हा वाघ मलेशियाचे राष्ट्रीय चिन्हावर विराजमान आहे.
  • सुमात्रन वाघ- (Panthera tigris sumatrae)
    सुमात्रन वाघ
    सुमात्रन वाघ
    ), हा वाघ इंडोनेशियाच्या सुमात्रा बेटावर आढ्ळून येतो व अतिशय चिंताजनक प्रजाती म्हणून याची गणना झाली आहे. हा वाघ आकाराने अतिशय लहान असतो. नराचे वजन १०० ते १३० किलो भरते तर मादीचे केवळ ७० ते ९० किलो. त्यांचा लहान आकार हा या बेटावरील अतिशय घनदाट जंगलात रहाण्यास सरावला आहे. जंगली सुमात्रन वाघांची संख्या आजमितीला ४०० ते ५०० असण्याची शक्यता आहे. सुमात्रामधील जंगलांचा -हास हे या वाघांची संख्या कमी होण्याचे मुख्य कारण आहे.
  • सायबेरीयन वाघ - (Panthera tigris altaica)
    सायबेरीयन वाघ
    सायबेरीयन वाघ
    ही प्रजाती पुर्व रशियात आढळून येतेह्, याला अमूर, मंचुरियन, कोरियन वाघ, अथवा उत्तर् चीनी वाघ असेही म्हणतात. पुर्वी मोठ्या भूभागावर वास्तव्य असलेल्या ह्या वाघाचे आज अमूर ऊशुरी या पुर्व सायबेरीयातील प्रांतातच वास्तव्य मर्यादीत राहिले आहे. रशियन सरकारने याच्या संरक्षणाचे मोठे प्रयत्न चालू केले आहेत. सध्या यांची संख्या ४५० ते ५०० आहे व केवळ एकाच मोठ्या जंगलात आहे त्यामुळे अमुर ला सर्वाधिक वाघांच्या संख्येचा मान मिळाला आहे. सायबेरीयन वाघ आकाराने वाघांमध्ये सर्वात मोठा असतो. त्याची फ़र ही खूप जाड असते व रंगाने थोडा हलका असतो.
  • दक्षिण चीनी वाघ-(Panthera tigris amoyensis) ही वाघांमधील सर्वात चिंताजनक प्रजाती आहे व वन्य अवस्थेत जवळपास नामशेषच झालेली आहे. १९८३ ते २००७ मध्ये एकही चीनी वाघ दृष्टीस पडला नाही. २००७ मध्ये एका शेतक-याने वाघ दिसल्याचे सांगितले[९]. माओंच्या चुकीच्या धोरणांमुळे तसेच चीनी औषधांसाठी ह्या वाघांची मोठ्या प्रमाणावर शिकार करण्यात आली. १९७७ मध्ये चीनी सरकारने या वाघाच्या शिकारीवर बंदी आणली पण तोवर खूप उशीर झाला होता. सध्या हे वाघ फ़क्त संग्रहालयात आहेत.

पांढरा वाघ - ही वाघाची कुठलीही वेगळी प्रजाती नसून हे केवळ वेगळ्या रंगाचे वाघ आहेत. जसे काही माणसांना कोड येतात व त्यांची त्वचा पांढरी पडते तसाच प्रकार या वाघांच्या बाबतीत होतो व असे होणे अनुवांशिक आहे तसेच वाघांचे पांढरे होणे हे देखील अनुवांशिक् आहे. आजचे सर्व पांढरे वाघ हे मध्यप्रदेशातील रेवा येथे सापडलेल्या पांढ-या वाघाचे वंशज आहेत[१०]. तसेच त्यानंतरचे सर्व पांढरे वाघ हे पुर्णत: प्राणी संग्रहालयातच जन्मलेले आहेत.


वाघाच्या नामशेष प्रजाती

  • बालि वाघ(Panthera tigris balica)
  • जावन वाघ(Panthera tigris sondaica)
  • कॆस्पीयन वाघ - (Panthera tigris virgata)

[संपादन] वाघ-मानव संघर्ष

[संपादन] वाघांची शिकार

हाकारे देउन्, चहुबाजूने वेढा देउन होणारी वाघाची शिकार
हाकारे देउन्, चहुबाजूने वेढा देउन होणारी वाघाची शिकार

भारतात प्राचीन काळापासून वाघाची शिकार होत आली आहे. वाघाची शिकार हे शौर्याचे प्रतिक मानले जायचे. आपल्या दिवाणखाण्यात वाघाची कातडी असणे मानाचे लक्षण होते. वाघाच्या कातडी बरोबरच वाघनखे गळ्यात असणे प्रतिष्ठेचे होते. वाघाच्या शिकारी साठी् मोठे मोठे हाकारे दिले जायचे व वाघाला चहुबाजूने वेढा देउन त्याची शिकार केली जात असे. यात बरेच लोक सामिल होत तसेच बरेच हत्ती घोडे असा ताफ़्याचा समावेश असे. त्यामुळे वाघाची शिकार हा फ़क्त राजे लोकांपुरते मर्यादीत होता. ब्रिटीश काळात वाघांच्या शिकारीत अमूलाग्र बदल झाला. बंदूकीसारखे शस्त्र माणसाच्या हातात पडल्यामुळे दूरुनही वाघांना टिपता येउ लागले व वाघांच्या शिकारीचा काळ सुरु झाला. ब्रिटीश काळात खास वाघाच्या शिकारी साठी अभयारण्ये स्थापली गेली. अनेक महान शिकारी या काळात उदयास आले. वाघाची शिकार झाडाखाली एखादे सावज बांधून वर मचाणवर बसून करत अथवा हाकारे देउन् साधत. वाघाची शिकार करणे हे धाडस न बनता एक खेळ बनला( इंग्रजीत गेम म्हणजे खेळ असाच अर्थ आहे). अनेक शिका-यांच्या कथनामध्ये काही काळानंतर त्यांना शिकार करणे हे व्यसनासारखेच जडले होते अशी कबुली देतात. वाघांचे नैसर्गिक वसतीस्थानावर मानवाचे बहुतांशी अतिक्रमण झाले आहे. जेथे वाघ एकेकाळी सुखेनैव नांदत त्याजागी, शेती, औद्योगिकरण, रस्ते, घरणे, गावे वसली. यामध्ये वाघांच्या वसती स्थानाबरोबरच भक्ष्यही नाहीसे झाले व अनेक ठिकाणी वाघांचे पाळिव प्रांण्यांवरील हल्ले वाढले. पाळिव प्राणी वाघ खातात म्हणून वाघ नको असा व्याघ्रप्रकल्पांच्या अजूबाजूच्या गावात अजूनही सूर असतो. ब्रिटीशपूर्व काळात वाघांची शिकार बहुतकरून याच कारणासाठी होत असे. वाघांच्या शिकारीवर बंदी आल्यानंतर ह्या वाघद्वेष्ट्यांनी वाघाने मारलेल्या भक्ष्यामध्ये विष घालून वाघांची शिकार करण्याचा सपाटा लावला होता. २० व्या शतकाच्या सुरुवातीस भारतात एक लाख वाघ होते असे काहींचे म्हणणे आहे. भारतात शेकडो शिकारी आहेत/ होते ज्यांनी शंभराहून अधिक वाघ मारले होते. त्यामुळे हा आकडा खरा असण्याची शक्यता नाकारता येत नाही. वाघांच्या शिकारीचा इतिहास वाघांच्या दृष्टीने रक्तरंजीत असला तरी त्यातील काही शिकारी हे आजचे टोकाचे वाघांचे रक्षक बनले आहेत. चोरटी शिकार आजही चालू असली तरी भारतात एकेकाळी मोठ्या प्रमाणात शौकीसाठी चालणारी वाघांची शिकार आज जवळपास इतिहास झाला आहे ही समाधानाची बाब आहे. तरीही अधून मधून संजय दत्त, सलमान खान सारखी प्रकरणे बाहेर येत असतात.

[संपादन] नरभक्षक वाघ

जो वाघ माणसांनाच आपले नेहेमीचे भक्ष्य बनवतो त्याला नरभक्षक वाघ असे म्हणतात. माणूस हा वाघांचे नैसर्गिक भक्ष्य नाही. वाघ माणसांशी संपर्क टाळतो. जर चुकुन एखादा माणूस स्वरक्षणार्थ वाघाकडून मारला गेला तर त्याला नरभक्षक म्हणणे चुकीचे आहे. जो वारंवार माणसांवर हल्ले करून माणसांनाच आपले भक्ष्य बनवतो असाच वाघ नरभक्षक होय. नरभक्षक वाघांचे अनेक किस्से आजही घडतात. खासकरून सुंदरबनच्या जंगलात. फ़क्त तेथिलच वाघ असे का? हा प्रश्ण ब-याच काळापासून सतावत आहे. सुंदरबनातील अत्यंत प्रतिकूल नैसर्गिक परिस्थिती व खार्‍यापाण्यामुळे तेथील वाघ माणसांबाबतीत आक्रमक झाले असावेत असा अंदाज आहे. [११]. स्वातंत्र्यपूर्व काळात उत्तरांचल राज्यात अनेक घटना घडल्या होत्या. त्यावर जिम कोर्बेट यांची नरभक्षक वाघांवरील मालिका प्रसिद्ध आहे. १९४० च्या दशकात पुण्याजवळील भीमाशंकरच्या जंगलात १०० च्या वर माणसे एका वाघाने मारली होती[१२]. वाघ नरभक्षक बनण्याची अनेक कारणे आहेत. वृद्धपणा, जखमांमुळे इतर शिकार साधता येण्यात येणारे अपयश किंवा काही पुर्वानुभव इत्यादी. कोर्बेट यांच्या मते उत्तरांचल मध्ये मानवी मृतदेहांना नदीत वाहून अत्यंसंस्कार करण्याची प्रथा होती असे वाहणारे आयते भक्ष्यामुळे तेथील वाघ नरभक्षक बनत असा अंदाज होता[१३].

[संपादन] चीनी औषधे

वाघाच्या शरीरातील विविध भागांचा चीनी औषधातील वापर
वाघाच्या शरीरातील विविध भागांचा चीनी औषधातील वापर

चीनमध्ये अनेकांचा असा समज आहे की वाघांचे काही भाग हे औषधी असतात व त्यांचा चांगला उपयोग होतो असे वाटते. परंतु यात काहीही शास्त्रीय तथ्य नाही.[१४] वाघाच्या मांडीची हाडे, इतर हाडे, सुळे, वाघनख्यांना खासकरून मागणी असते.वाघाचे शिश्न हे नपुंसकतेसाठी औषध असल्याचे मानतात. चीन मध्ये कायद्याने वाघांचे शरीराचे भागांची खरेदी विक्री कायद्याने बंदी आहे व दोषींना देहदंडाची शिक्षा आहे. परंतु आजवरच्या अनुभवावरून चीन सरकारचे प्रयत्न कमी आहेत असे वाटते. चीनमध्ये काही ठिकाणी रस्त्यावर वाघांच्या शरीरांच्या भागाची तसेच कातडीची विक्री होते असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे.[१५]

भारत, मलेशिया, ब्रम्हदेश, थायलंडमधील वाघांची चोरटी शिकार ही बहुत करून चीनी गि-हाईकांच्या साठी होते. बंदी असणे गरजेचे असले तरी त्याहीपेक्षा महत्वाचे आहे, अश्या औषधांविरुद्ध प्रबोधन होणे. औषधांमुळे वाघांच्या हाडांना व इतर भागांना मागणी निर्माण होते व कितीही बंदी असली तरी पैश्याच्या मोहामुळे लोभी लोक चोरट्या शिकारीचा मार्ग धरणारच, जर मागणीच नसेल तर अशी चोरटी शिकार कमी होईल अशी आशा आहे.

[संपादन] भारतीय संस्कृतीत

भारतीय संस्कृतीत वाघाला देवीचे वाहन म्हणून स्थान मिळाले आहे.
भारतीय संस्कृतीत वाघाला देवीचे वाहन म्हणून स्थान मिळाले आहे.

वाघाला भारतीय संस्कृतीत आदरयुक्त भीतीचे स्थान आहे. लहान मुलांना जंगलाचा राजा म्हणून वाघाची ओळख करून देतात. वाघ हे भारताचा राष्ट्रीय प्राणी असून जनमानसात शौर्य, राजबिंडेपणा, सौंदर्याचे, राकटतेचे प्रतिक आहे. म्हणूनच भारतीय संस्कृतीत त्याला पार्वतीचा अवतार असलेली देवी महिषासूर मर्दिनीचे व तिच्या अनेक रुपांचे वाहन बनवले आहे. वाघ व आदिवासी जमांतींचा सहस्त्रावधी वर्षांचा संबध असल्याने ते वाघाचा कोप होउ नये यासाठी ते वाघाला देवताच मानतात व त्याची पूजा करतात. वाघ असलेल्या जंगलामध्ये वाघांना समर्पित एखादे छोटेसे देऊळ असतेच. वाघ हे शौर्य साहस व राजबिंडेपणाचे प्रतिक असल्याने अनेक ठिकाणी वाघाला प्रतिकात्मक स्थान आहे. महाराष्ट्रातील राजकिय पक्ष शिवसेनेचे प्रतिकात्मक चिन्ह वाघ आहे. अनेक संस्थानिकांच्या मानचिन्हांवर वाघ विराजमान आहे. वाघांबद्द्ल असलेल्या भीतीमुळे वाघांबद्दल अनेक विनोदही होत असतात.

[संपादन] संरक्षण उपायोजना

[संपादन] भारत

[संपादन] रशिया

[संपादन] चीन

[संपादन] वाघाचे महत्व

[संपादन] संदर्भ व नोंदी

  1. Save The Tiger Fund | Wild Tiger Conservation
  2. भारत सरकार राष्ट्रीय चिन्हे
  3. Valmik Thapar- Land of the Tigers, A Natural history of the indian subcontinent
  4. Sattantar- le.vyakatesh Madgulkar
  5. आपली सृष्टी आपले धन भाग ४- निसर्ग प्रकाशन ले. मिलिंद वाटवे
  6. India tiger population declines बी.बी.सी. न्युज १३ फ़ेब्रुवारी २००८
  7. Population of tigers in the country
  8. Tigers face extinction in Panna reserve डेक्कन हेराल्ड
  9. http://news.bbc.co.uk/1/hi/world/asia-pacific/7042257.stm
  10. History of first white tiger
  11. http://ces.iisc.ernet.in/hpg/envis/tigdoc813.html | Man-eating tigers rule in vast Indian mangrove swamp]
  12. भीमाशंकरचा नरभक्षक- ले. सुरेशचंद्र वारघडे
  13. रुद्रप्रयागचा नरभक्षक (मराठी अनुवाद)ले. जिम कोर्बेट
  14. http://savingtigers.com/st-home/st-inthewild/traditionalchinesemedicine
  15. Tiger skin trade 'getting worse'



[संपादन] बाह्यदुवे

वाघ
वाघ


aa - ab - af - ak - als - am - an - ang - ar - arc - as - ast - av - ay - az - ba - bar - bat_smg - bcl - be - be_x_old - bg - bh - bi - bm - bn - bo - bpy - br - bs - bug - bxr - ca - cbk_zam - cdo - ce - ceb - ch - cho - chr - chy - co - cr - crh - cs - csb - cu - cv - cy - da - de - diq - dsb - dv - dz - ee - el - eml - en - eo - es - et - eu - ext - fa - ff - fi - fiu_vro - fj - fo - fr - frp - fur - fy - ga - gan - gd - gl - glk - gn - got - gu - gv - ha - hak - haw - he - hi - hif - ho - hr - hsb - ht - hu - hy - hz - ia - id - ie - ig - ii - ik - ilo - io - is - it - iu - ja - jbo - jv - ka - kaa - kab - kg - ki - kj - kk - kl - km - kn - ko - kr - ks - ksh - ku - kv - kw - ky - la - lad - lb - lbe - lg - li - lij - lmo - ln - lo - lt - lv - map_bms - mdf - mg - mh - mi - mk - ml - mn - mo - mr - mt - mus - my - myv - mzn - na - nah - nap - nds - nds_nl - ne - new - ng - nl - nn - no - nov - nrm - nv - ny - oc - om - or - os - pa - pag - pam - pap - pdc - pi - pih - pl - pms - ps - pt - qu - quality - rm - rmy - rn - ro - roa_rup - roa_tara - ru - rw - sa - sah - sc - scn - sco - sd - se - sg - sh - si - simple - sk - sl - sm - sn - so - sr - srn - ss - st - stq - su - sv - sw - szl - ta - te - tet - tg - th - ti - tk - tl - tlh - tn - to - tpi - tr - ts - tt - tum - tw - ty - udm - ug - uk - ur - uz - ve - vec - vi - vls - vo - wa - war - wo - wuu - xal - xh - yi - yo - za - zea - zh - zh_classical - zh_min_nan - zh_yue - zu -