अन्नपूर्णास्तोत्रम्
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
हिंदू धर्मग्रंथावरील लेखमालेचा भाग | |
वेद | |
---|---|
ऋग्वेद · यजुर्वेद | |
सामवेद · अथर्ववेद | |
वेद-विभाग | |
संहिता · ब्राह्मणे | |
आरण्यके · उपनिषदे | |
उपनिषदे | |
ऐतरेय · बृहदारण्यक | |
ईश · तैत्तरिय · छांदोग्य | |
केन · मुंडक | |
मांडुक्य ·प्रश्न | |
श्वेतश्वतार ·नारायण | |
वेदांग | |
शिक्षा · चंड | |
व्याकरण · निरुक्त | |
ज्योतिष · कल्प | |
इतिहास | |
रामायण · महाभारत | |
इतर ग्रंथ | |
स्मृती · पुराणे | |
भगवद्गीता · ज्ञानेश्वरी · गीताई | |
पंचतंत्र · तंत्र | |
स्तोत्रे | |
मनाचे श्लोक · रामचरितमानस | |
शिक्षापत्री · वचनामृत |
नित्यानन्दकरी वराभयकरी सौन्दर्यरत्नाकरी निर्धूताखिलघोरपावनकरी प्रत्यक्षमाहेश्वरी ।
प्रालेयाचलवंशपावनकरी काशीपुराधीश्वरी भिक्षां देहि कृपावलम्बनकरी मातान्नपूर्णेश्वरी ॥१॥
हे अन्नपूर्णा माते ! तू सर्वांना नेहमी आनंद देणारी आहेस. तू एका हाताने वरमुद्रा आणि दुसर्या हाताने अभयमुद्रा धारण केलेली आहे. तू सर्व प्रकारच्या रत्नांची खाण आहेस. तू सम्पूर्ण पातकांचा नाश करणारी असून प्रत्यक्ष महेश्वराची प्राणवल्लभा आहेस. तू जन्म घेऊन हिमालयाचा वंश पवित्र केला आहेस. तू काशी नगरीची अधीश्वरी आहेस. कृपापूर्ण दृष्टीने आधार देऊन हे आई, अन्नपूर्णेश्वरी मला तू भिक्षा दे. ॥१॥
नानारत्नविचित्रभूषणकरी हेमाम्बराडम्बरी मुक्ताहारविलम्बमानविलसद्वक्षोजकुम्भान्तरी ।
काश्मीरागुरूवासिता रुचिकरी काशीपुराधीश्वरी भिक्षां देहि कृपावलम्बनकरी मातान्नपूर्णेश्वरी ॥२॥
जिच्या हातामध्यं अनेक प्रकारचीं रत्नजडित आश्चर्यकारक भूषणें आहेत, जिच्या सिंहासनाच्या प्रभावळीवर सोन्याचे भरजरी वस्त्र शोभत आहे, जिच्या वक्षःस्थलावर मोत्यांचे हार शोभा देत आहेत, केशर, कस्तुरी, अंगरू, चंदन ह्यांचे उटणें अंगाला लावल्याने जिचे अंग अधिक शोभत आहे, भक्त जनांना कृपेचा आधार देणारी अन्नपूर्णा माते ! तू मला भिक्षा घाल. ॥२॥
योगानन्दकरी रिपुक्षयकरी धर्माथनिष्ठाकरी चन्द्रार्कानलभासमानलहरी त्रैलोक्यरक्षाकरी ।
सर्वैश्वर्यसमस्तवांछनकरी काशीपुराधीश्वरी भिक्षां देहि कृपावलम्बनकरी मातान्नपूर्णेश्वरी ॥३॥
हे अन्नपूर्णा माते ! अव्दैतात प्राप्त होणारा आनंद तू व्दैतातही प्राप्त करून देतेस. सर्व शत्रूंचा नाश करतेस. धर्माच्या ठिकाणीं तूच निष्ठा निर्माण करतेस. चंद्र, सूर्य आणि अग्नी ह्यांच्या तेजाप्रमाणे तुझ्या कांतीच्या छ्टा भासतात. तू त्रैलोक्याचे रक्षण करतेस. जगाला सर्व प्रकारचे वांछित ऎश्वर्य देतेस, तू काशी नगरीत वास्तव्य करतेस. अशा प्रकारे सर्वांवर कृपा करणार्या माते ! तू मला भिक्षा घाल. ॥३॥
कैलासाचलकन्दरालयकरी गौरी उमाशङ्करी कौमारी निगमार्थगोचरकरी ॐकारबीजाक्षरी ।
मोक्षव्दारकपाटपाटनकरी काशीपुराधीश्वरी भिक्षां देहि कृपावलम्बनकरी मातान्नपूर्णेश्वरी ॥४॥
हे आई ! तू कैलास पर्वताच्या गुहेत राहतेस. तू गौरी आहेस. तूच उमा असून शंकराने तुझा अंगिकार केल्याने तुला शांकरी असे देखिल म्हणतात. तू कैवारी म्हणजे कार्तिक स्वामीची आई आहेस.तूच वेदांचा अर्थ स्पष्ट करतेस. ओंकार म्हणजेच प्रणव हेंच तुझ्या ज्ञानाचे बीज आहे. तू अक्षरी म्हणजे अविनाशी आहेस. भक्तांसाठी तू मोक्षाचे दरवाजे उघडतेस. अशा हे आई ! तू मला भिक्षा घाल. ॥४।
दृश्यादृश्यविभूतवाहनकरी ब्रम्हाण्डभाण्डोदरी लीलानाटकसूत्रभेदनकरी विज्ञानदीपाङ्कुरी ।
श्रीविश्वेशमनःप्रसादनकरी काशीपुराधीश्वरी भिक्षां देहि कृपावलम्बनकरी मातान्नपूर्णेश्वरी ॥५॥
हे अन्नपूर्णा माते ! दृश्य आणि अदृश्य अशा ज्या काही ईश्वराच्या विभूति आहेत त्यांना आपापले कार्य करण्याची शक्ति तूच देतेस. सम्पूर्ण ब्रम्हाण्डरूपी भांडे तुझ्याच उदरात सामावलेले आहे. लीलेने तूच हे जगत् रूपी नाटक करतेस - चालवतेस. तुझ्याच कृपेने भक्तांच्या ह्दयात ज्ञानरूपी दीप प्रज्वलित होतो. काशीविश्वेश्वराच्या मनाला तूच प्रसन्न करतेस. अशा हे आई ! तू मला भिक्षा घाल. ॥५॥
उर्वी सर्वजनेश्वरी भगवती मातान्नपूर्णेश्वरी वेणीनीलसमानकुन्तलहरी नित्यान्नदानेश्वरी ।
सर्वानन्दकरी सदाशुभकरी काशीपुराधीश्वरी भिक्षां देहि कृपावलम्बनकरी मातान्नपूर्णेश्वरी ॥६॥
हे आई ! तुझे मूल्य पृथ्वीपेक्षाही अधिक आहे. तू सर्व जनांची अधीश्वरी आहेस. तू पूर्णतेचे अन्न खायला देणारी माता आहेस. तुझ्या काळ्याभोर केसांच्या वेणीने मन आकृष्ट होते. तू नेहमी अन्नाचें दान करतेस, सर्वांना आनंद देतेस. नेहमी सर्वांचे कल्याण करतेस. सर्वांवर कृपा करणार्या हे माते ! तू मला भिक्षा घाल. ॥६॥
आदिक्षान्तिसमस्तवर्णनकरी शम्भोस्त्रिभावाकरी काश्मीरात्रिपुरेश्वरी त्रिनयनी नित्याङ्कुरा शर्वरी ।
कामाकाङ्क्षकरी जनोदयकरी काशीपुराधीश्वरी भिक्षां देहि कृपावलम्बनकरी मातान्नपूर्णेश्वरी ॥७॥
आई ! 'अ' पासून 'क्ष' पर्यंतच्या सर्व शब्दात तुझीच शक्ति आहे. कल्याण करणारी शक्ति जो शंभु त्याची तू प्राणवल्लभा आहेस. तुझ्या ठिकाणीं तीनही (प्रेमभाव, आत्मीयता आणि एकभाव) भाव आहेत. तुझ्या एकाच शरीरात काश्मीर म्हणजे स्थूल, सूक्ष्म आणि लिंग अशी तीन शरींरे आहेत. तुझ्या नेत्रात पोषक, शोधक आणि स्निग्ध असे तीन भाव आहेत. तुझ्या भावांना सतत अकुंर फुटत असतात. तू प्रेमाने फटके मारतेस. तू कामना पूर्ण करतेस आणि सर्व जीवांचा उदय करतेस. अशा हे माते ! तू मला भिक्षा घाल. ॥७॥
देवी सर्वविचित्ररत्नरचिता दाक्षायणी सुन्दरी वामा स्वादुपयोगधरप्रियकरी सौभाग्यमाहेश्वरी ।
भक्ताभीष्टकरी दशाशुभहरी काशीपुराधीश्वरी भिक्षां देहि कृपावलम्बनकरी मातान्नपूर्णेश्वरी ॥८॥
हे आई ! तू देवी म्हणजे प्रकाशरूप आहेस. तू स्वकार्यात दक्ष आहेस.(दक्ष प्रजापतीची कन्या म्हणूनही पार्वतीला दाक्षायणी असे नाव आहे.) तू सुन्दर आणि आकर्षक आहेस. तुझे स्तन्य मधुर आहे. तू सर्वांचे प्रिय करतेस. तू सर्व सौभाग्यसंपन्न अशी प्रत्यक्ष महेश्वराची पत्नी आहेस. (तू सर्व जगाला सौभाग्य देणारी आहेस.) तू भक्तांचे कल्याण करतेस. तू दहा प्रकारची पापें नाहीशी करतेस. (अशुभ म्हणजे पाप. तीन कायिक, चार वाचिक आणि तीन मानसिक पापें आहेत.) अशा हे मातें ! तू मला भिक्षा घाल. ॥८॥
चन्द्रार्कालयकोटिकोटिसदृशा चन्द्रांशुबिम्बाधरी चन्द्रार्काग्निसमानकुंडलधरी चन्द्रार्कवर्णेश्वरी ।
मालापुस्तकपाशसांकुशधरी काशीपुराधीश्वरी भिक्षां देहि कृपावलम्बनकरी मातान्नपूर्णेश्वरी ॥९॥
हे आई ! कोटि कोटि चंद्र, सूर्य वा अग्नी ह्यांच्या तेजापेक्षाही तुझे तेज अधिक आहे. तुझे ओठ उदयाला येणार्या चंद्राच्या किरणाप्रमाणे आरक्त आहेत. कानातील कुण्डले चंद्र-सूर्याप्रमाणे झळकत आहेत, अग्निप्रमाणे देदिप्यमान आहेत. तुझा वर्णही चंद्र-सूर्याप्रमाणेच आहे. तू हातात पाश, माळा, पुस्तक आणि अंकुश धारण करतेस. अशा हे आई ! तू मला भिक्षा घाल. ॥९॥
क्षत्रत्राणकरी महाऽभयकरी माता कृपासागरी साक्षान्मोक्षकरी सदा शिवकरी विश्वेश्वरी श्रीधरी ।
दक्षाक्रन्दकरी निरामयकरी काशीपुराधीश्वरी भिक्षां देहि कृपावलम्बनकरी मातान्नपूर्णेश्वरी ॥१०॥
हे माते अन्नपूर्णे ! समाजाचे रक्षण करणार्या क्षत्रियांचेही तूच रक्षण करतेस. मोठमोठ्या भयांचे, संकटांचे तू हरण करतेस, अभय देतेस. तू सर्वांची माता आहेस. तू कृपासागर आहेस. मोक्ष देणारी आहेस. सदासर्वकाळ कल्याण करणारी आहेस. तू विश्वाची स्वामिनी आहेस. अव्याहत ऎश्वर्य देणारी आहेस. दक्ष प्रजापतीला तू आक्रन्दन करायला लावलेस. (दक्ष म्हणजे व्यवहारी. ह्यांना ध्येयनिष्ठ आणि तत्त्वनिष्ठ माणसें आवडत नाहीत. ध्येयनिष्ठ, तत्त्वनिष्ठ माणसांवर आक्रमण करणार्यांचा तू नाश करतेस.) तू भक्तजनांना निरामय करतेस. अशा हे आई ! तू मला भिक्षा घाल. ॥१०॥
भगवति भवरोगात्पीडितं दुष्कृतोत्थात् सुतदुहितृकलत्रोपद्रवेणानुयातम् ।
विलसदमृतदृष्ट्या वीक्ष्य विभ्रान्तचित्तं सकलभुवनमातस्त्राहि मामों नमस्ते ॥११॥
हे आई भगवतें ! मीच आचरलेल्या दुष्कृत्यांनी प्राप्त झालेल्या ह्या भवरोगाने मी अत्यन्त पीडित झालों आहे. पुत्र, कन्या, पत्नी ह्यांच्या उपद्रवाने हैराण झालो आहे. मी ह्या संसारात अत्यन्त गोंधळून गेलो आहे. अशा माझ्याकडे तू अमृतमय प्रसन्न दृष्टीने पाहा. ओंकारस्वरूप असलेल्या तुला माझा नमस्कार असो. ॥११॥
माहेश्वरीमाश्रितकल्पवल्लीमहम्भवोच्छेदकरीं भवानींम् ।
क्षुधार्तजायातनयाद्युपेतस्त्वामन्नपूर्णे शरणं प्रपद्ये ॥१२॥
हे आई अन्नपूर्णे ! लोकदृष्ट्या तू महेश्वराची अर्धांगी परन्तु तत्त्वतः अधिष्ठानशक्ति आहेस. आश्रितांचे सर्व मनोरथ पूर्ण करणारी आहेस. भक्तांचा अहंकार आणि दुःखमय संसार ह्यांचा नाश करणारी आहेस. कल्याण, उत्कर्ष आणि समृद्धि ह्यांची प्राप्ती तूच करून देतेस. भुकेने व्याकूळ झालेला, पुत्र-कलत्र इत्यादि परिवाराने युक्त असा मी तुला शरण आलों आहे. ॥१२॥
दारिद्र्यदावानलदह्यमानं पाह्यन्नपूर्णे गिरिराजकन्ये ।
कृपाम्बुधौ मज्जय मां त्वदीये त्वत्पादपद्मार्पितचित्तवृत्तिम् ॥१३॥
हे गिरिराज कन्ये ! दारिद्र्यरूपी वणव्याने मी चोहीकडून होरपळून निघत आहे. माझा दाह शान्त होण्यासाठीं मी माझ्या सर्व चित्तवृत्ति तुझ्या चरणकमलांवर अर्पण केल्या आहेत. तू मला तुझ्या कृपारूपी सागरात निमग्न कर. माझे रक्षण कर. ॥१३॥
अन्नपूर्णे सदा पूर्णे शङ्करप्राणवल्लभे ।
ज्ञानवैराग्यसिद्ध्यर्थं भिक्षां देहि च पार्वति ॥१४॥
हे माते अन्नपूर्णे ! तू सदा, नित्य परिपूर्ण आहेस. तू शंकराची प्राण वल्लभा आहेस. माझ्या ठिकाणी ज्ञान आणि वैराग्य निर्माण होण्यासाठी हे आई ! तू मला भिक्षा घाल. ॥१४॥
माता च पार्वती देवी पिता देवो महेश्वरः ।
बान्धवाः शिवभक्ताश्च स्वेदेशो भुवनत्रयम् ॥१५॥
देवी पार्वती माझी माता आहे. भगवान महेश्वर माझे पिता आहेत. सर्व शिवभक्त हे माझे बांधव आहेत आणि त्रिभुवन हाच माझा स्वदेश आहे. ॥१५॥
इति श्रीमच्छंकराचार्यविरचितमन्नपूर्णास्तोत्रं संपूर्णम् ।